' भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', असे धीराचे नुसते शब्द जरी कानावर पडले तरी संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. धीराच्या आश्वासक शब्दांमध्ये मोठ्यातलं मोठं संकटही झेलायचं सामर्थ्य असते. संकटात माणूस एकाकीपणाच्या भावनेनं खचतो, आत्मबल गमावतो, नैराश्य येतं. अशावेळी मदतीचा एक हात, 'बुडत्याला काडीचा आधार 'या म्हणीला सार्थ ठरवत सावरण्याचे काम करतो.
संवेदनशीलतेने आपण इतरांच्या दुःखाशी, अडचणींशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा काहीतरी करायला हवं या जाणिवेची मनाच्या गाभाऱ्यात एक इवलीशी ज्योत प्रज्वलित होते. पेटलेला दीप अखंड तेवत राहण्यासाठी ज्योतीने ज्योती लावायला हव्यात नाही का? असाच एक दीप 'हेलपिंग हॅन्ड्स ग्रुप ऑफ रत्नागिरी 'प्रज्वलित झाला आहे.खात्री आहे पुढे जाऊन हा छोटासा दीप इतरांसाठी दीपस्तंभ ठरेल.
अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिकणारी मुले इतर नामांकित शाळांच्या तुलनेत फारशी कुठे चमकत नाहीत असा माझा व्होरा होता. परंतु संख्यात्मक गुणवत्तेपेक्षा संस्कारक्षम गुणात्मक गुणवत्ता येथील माजी विद्यार्थ्यांनी जी दाखवली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. 22 ते 23 वर्षे वयोगटातील ही मुले, इतरांसाठी काहीतरी करावं या जाणिवेनं स्वतः सेटल नसतानाही एवढ्या लहान वयात एका छान विचाराने एकत्र येतात. या ग्रुपमध्ये आमच्या शेजारची एक मुलगी आहे.तिने तिच्या या ग्रुपबद्दल मला सांगितले. मला ऐकून चांगलं वाटलं. तू ही जॉईन होशील का? असे तिने मला विचारताच या ग्रुपमधील इतर कोणी ओळखीचे नसतानाही केवळ दुसऱ्यांसाठी फुटू पाहणारे हे कोंब, यांना छान धुमारे फुटावेत, त्याचा पुढे जाऊन मोठा वृक्ष व्हावा, तसेच हे रोप मोठे होण्यास आपलाही हातभार लागावा या हेतूने मी त्यांना लगेच जॉईन झाले. आणि आज त्यांचं हे रुजणं कौतुकाने पहातेय.
स्वतः शिकत, कामासाठी धडपड करत असताना प्रत्येकाने महिन्यातून किमान 100/रुपये फंड जमा करावा ही माफक अपेक्षा. एकमेकांवरील विश्वासाने पैसे एकत्र करून गेल्या काही महिन्यात छोटे छोटे 3ते 4 कार्यक्रम करून जिथे मदत केली तेथील गरज विचारात घेऊन ग्रुपच्या क्षमतेनुसार छोटेखानी मदतही केली. अशावेळी ज्यांना शक्य होईल ते येऊन तो कार्यक्रम छान निभावून नेतात. या मुलांचं कौतुक अशासाठी की ज्या वयात तरुणाई मौजमजेत जगत असताना ही मुलं मात्र आपल्या संघर्षमय जीवनात गरजूना मदतीचा हात देऊ पाहताहेत.
क्षमता असणारे हातही सहसा कुणासाठी पुढे सरसावत नाहीत. इतरांसाठी काहीतरी करावं ही इच्छाच नसते. किंबहुना मी, माझं यापलिकडे पाहण्याची गरज वाटत नाही. देवधर्मासाठी शे -पाचशे रुपये सहज देतात. हेतू हाच की तेवढंच पुण्य मिळेल. इथेही देण्यामागे छुपा स्वार्थच दडलेला असतो. मूर्तीतल्या देवाला गरज नसतानाही अलंकारांनी सजवलं जातं. परंतु दारात आलेल्या गरजूला हाडतूड केलं जातं.
माणूस कोणत्याही जातीधर्माचा असो त्याचा धर्म एकच मानवता धर्म असायला हवा. माणसा-माणसाचं फक्त आणि फक्त माणुसकीचं नातं असायला हवे. जुनी पिढी अज्ञानामुळं असेल वा कर्मठपणामुळे असेल अनिष्ट रूढी परंपराना गोंजारत राहिली. परंतु हे चित्र बदलण्याचे सामर्थ्य केवळ आताच्या सुशिक्षित तरुण पिढीमध्ये आहे नव्हे असायलाच हवं. समविचारांनी एकत्र येऊन समाजात काही चांगलं योगदान देऊ पाहतील तेव्हाच थोड्याफार प्रमाणात मना-मनातील अंतर मिटवण्यास पूरक स्थिती निर्माण होईल. एकजुटीसाठी वेगळ्या जाणीव जागृतीची गरज मग उरणार नाही.
धन्य ते पालक व धन्य ती शाळा ज्यांनी हेलपिंग हॅन्ड्सच्या रूपात समाज उभारणीसाठी सुजाण नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक जबाबदार पिढी समाजाला दिली. चला तर मग......
ज्योतीने ज्योती उजळवू या
हाताला हात देऊ या ll
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Thank you so much madam !!
ReplyDelete👌👍
Delete