Friday, February 1, 2019

'नाते मैत्रीचे'

जगात सर्वात जवळचं व जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मैत्रीचे. सुखात एखादे वेळेस कमी परंतु दुःखात मात्र सर्वात आधी मित्राची आठवण होते. त्याच्याशी बोलून मनातले सल, कढ व्यक्त करावेत. मनावर हळुवार फुंकर घालणारे धीराचे शब्द ऐकले की मन हलकं वाटायला लावणारे हक्काचे आपले असे मैत्रीचे नाते. या नात्याला वय, काळ, स्थळ याचे बंधन नसते. कोणत्याही मर्यादेत बांधू न शकणारे एक हवेहवेसे नाते. ज्याचा मित्रपरिवार मोठा तो श्रीमंत, परंतु ज्याचा मित्रपरिवार छोटा तोही त्याच्या परीने श्रीमंतच बरं का !किती यापेक्षा कसे यालाही तितकंच महत्व आहे. उत्तम मित्र लाभले तर आयुष्याचे सोनं होतं, तर चुकीच्या मित्रांमुळे माती होते. समाजात ओळख तयार होते. तर कधी अब्रूही पणाला लावते. अशी ही मैत्री ईश्वराने दिलेलं वरदान असे म्हणतात. पण हेच नातं शाप ठरलं तर.....................
                        आपल्या मित्राच्या सुखात निर्भेळ आनंद मानणारा त्याच्या दुःखाने तितकाच व्यथित होतो. निस्वार्थीपणे तो मित्राचं हित व्हावं म्हणून प्रार्थना करतो. हक्काने रागावतो. पण कधीतरी गैरसमजाने म्हणा वा अन्य काही कारणाने हा हक्क नाकारून तो चांगल्यात वाईट शोधू लागतो. तेव्हा त्या होणाऱ्या यातना फार त्रासदायक ठरतात. तिथे विश्वास, प्रेम उरत नाही तर उरतो फक्त अविश्वास, द्वेष. कालपर्यंत जीवाला जीव देणारे आज जीवघेणी भाषा वापरतात. सात जन्माचे वैर असल्यासारखे आरोप -प्रत्यारोप करू लागतात. आपलं सर्वात जास्त नुकसान आपल्याच मित्राने केलं आहे. असा समज करून मागील सर्व नातं प्रेम, जिव्हाळा सर्व काही क्षणात खाक केलं जातं. अशा वेळी खूप दुःखदायक असं हे नातं ठरतं. तुटलेली रक्ताची नाती कधी ना कधी सांधतात पण हे नातं कधीच सांधलही जात नाही व नाकारलंही. ते ठुसठुसत राहतं अस्वत्थाम्याच्या जखमेसारखं आजन्म भळभळत राहण्याचा शाप देऊन जातं.
                         कोणत्या दुर्दैवी क्षणी आपली मैत्री , ओळख झाली असं स्वतःला दूषणं देण्याव्यतिरिक आपल्या हाती काहीच उरत नाही. सर्वच नात्यात वेदना असतात. पण त्या ग्राह्य असतात. परंतु हळव्या क्षणी हवेसे वाटणारे नाते जेव्हा मनावरचा दगड बनून राहते तेव्हा आयुष्य दगडाहूनही जड बनतं. अन्य कोणावर नको त्या शब्दात राग काढता तरी येतो. परंतु आपलाच मित्र आपला अपराधी म्हणून समोर येतो, तेव्हा स्थिती महाभारतातल्या अर्जुनासारखी होते. ना बोलता येत ना टाळता येत. मनातले कढ मनातच दाबुन टाकायची वेळ येते. तेव्हा आपली वाणीही आपल्या ला सोडून गेली की काय? असेच काहीसे क्षण येतात.
                आपला निकोप दृष्टीकोन, अपेक्षा नात्याचं मूल्य ठरवत असतात.आजच्या या टेकनोसॅव्ही युगात नात्यातील संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे.नातं तयार करणं, ते जपणं, टिकवणं दुरापास्त झालं आहे. तरीही प्रत्येकाने नाती जपणं ही नैतिक जबाबदारी समजून संयमाने नाती टिकवली पाहिजेत.

                              मुग्धा कुळये
                                 रत्नागिरी. 

No comments:

Post a Comment