Tuesday, February 12, 2019

'जग हे सुंदर आहे '

               माणूस म्हणून जन्माला आल्यावर समूहात जगणं ही त्याची गरज असते. समाजाने ठरवून दिलेल्या  नियमांच्या चौकटीत जगणं त्याला बंधनकारक असते. ते सर्वांच्याच हिताचं असतं. पण कधीतरी समाजविरोधी स्थिती उद्भवली तरी त्या व्यक्तीला स्वतः साठी ठोस असं काहीच ठरवता येत नाही, की निर्णय घेता येत. सतत इतरांना काय वाटेल या भीतीच्या छायेत त्याच्या आतल्या 'स्व'ला तो नकळत मिटवत जातो. तर एखादा या प्रवाहाविरोधात जाण्याचं धाडस करतो व त्याला सापडतो स्वतःच्या आत विखुरलेला 'स्व'.त्याला तो एकत्रित करतो व नव्या उमेदीने भरारी घेतो.
                 ' ब्र 'हे लेखिका कविता महाजन यांचं  आदिवासींच्या सामाजिक जीवनावर, आजूबाजूच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारं पुस्तक वाचनात आलं. अंतर्मनाला भिडणारं असं हे लेखन मला नकळत त्या दुनियेत घेऊन गेलं. तिथे मला प्रफुल्ला भेटली. प्रफुल्ला ही सर्वसाधारण गृहिणीचं  प्रतिनिधीत्व करणारी सामान्य स्त्री ते सेवाभावी वृत्तीने कार्य करणारी एक खंबीर स्त्री. हा तिचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. तिच्यातील होत गेलेले बदल थक्क करणारे आहेत. परिस्थितीला धैर्याने सामोरं जाऊ पाहणाऱ्या अनेकजणींसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की.
                       प्रफुल्ला एक घटस्फोटित स्त्री. जिला नवऱ्याने व स्वतःच्या मुलानेही नाकारले. पोटगीवर जगणारी, परिस्थितीसमोर हताश झालेली अगतिक स्त्री. तिच्या जीवन जगण्यास काही अर्थ नाही अशी निर्माण झालेली स्थिती. का? कुणासाठी? कशासाठी जगतोय? या निरर्थक जगण्याला काय अर्थ आहे असं वाटत असतानाच 'प्रगत 'या सामाजिक संस्थेशी तिचा संपर्क येतो व तिला सापडतो जगण्याचा नवा अर्थ व दृष्टिकोन.
                      खरंतर काहीच पूर्वानुभव नसताना चित्रकला विषयाची पदवीधर प्रफुल्ला सामाजिक संस्थेत वेळ सत्कारणी लावावा, तेवढंच गुंतून राहिलो तर एकाकीपणाची धार बोथट होईल व स्वतःलाही अजमावता येईल या विचाराने ती हे काम हाती घेते महाराष्ट्रातील आदिवासी स्त्रियांचा राजकारणातील सहभाग, समाजकारण ते राजकारण प्रवास, यात महिला म्हणून येणाऱ्या अडचणी,समस्या, प्रत्यक्ष निवडून आल्यावर येणारे अनुभव याबाबतचा सर्वे करण्याचं काम ती सुरू करते. आदिवासी वस्ती  असणाऱ्या गावात जाऊन तेथील निवडून आलेल्या स्त्रियांची भेट घेणं, त्यांच्याशी बोलून कामाचं स्वरूप जाणून घेण्याचं काम ती अत्यंत मनापासून, आवडीने प्रसंगी त्यांच्यातीलच एक होऊन करते. तिला भेटलेली अनेक माणसं जीवनाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी तिला  देतात. शहरात राहिलेली एक नाजूक स्त्री खेडोपाडयात,डोंगरदऱ्यात, रानोमाळ, उन्हातान्हातून, काट्याकुटयांतून बरेच वेळा पायी प्रवास व त्यातून घडत गेलेली कणखर स्त्री माझ्यातल्या स्त्रीला भावते जवळची वाटते.
                    समाजात अशा किती प्रफुल्ला आहेत की ज्यांना अशी नवी उमेद देणारी वाट सापडली?असं एकाकी आयुष्य आलं की कोलमडून पडणाऱ्याच जास्त बघायला मिळतात. जणू जीवन जगण्यासाठी एकच निमित्त असतं. कोशातून बाहेर डोकावलं तर अनेक सन्मार्गाच्या वाटा खुणावतील. गरज आहे ती नव्याने जग समजून घेण्याची.  जीवन सुंदर जगण्याचे अनेक पर्याय आहेत. या जगण्यात इतरांनाही सामावून घेतल्यास आपणासाठी सर्व नसून सर्वांसाठी आपण ही व्यापक दृष्टी मिळेल व सौंदर्याचा एक नवा मापदंड जग सुंदर असल्याची अनुभूती देईल. चला तर मग देऊ संदेश नवा 'जग हे सुंदर आहे, जग हे सुंदर आहे '.
   
                                सौ. मुग्धा कुळये
                                      रत्नागिरी.

1 comment:

  1. आपल्या कोशात अडकून न राहता,सामजिक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे

    ReplyDelete