'संगोपन ' हा विषय पालक व एक शिक्षक म्हणून पण माझा जिव्हाळ्याचा आहे. संगोपन म्हटलं की फक्त बाळाला वाढवणं, त्याला खाऊ -पिऊ घालणं, त्याला सांभाळणं एवढंच असा समज आहे. पालक म्हणून मूल वाढवताना हे आपलं कर्तव्य खूप प्रेमाने करत असतो. तरीही खऱ्या अर्थाने होते का संगोपन? हा चिंतनाचा विषय आहे. खरं तर खूप व्यापक असा हा विषय आहे. प्रसंगानुरूप, परिस्थितीनुरुप बदलणारा आहे. इथे कालचे अनुभव आज उपयोगाचे असतीलच असे नाही. काळ बदलला, पालक बदलले, मुलं बदलली तसे संगोपनाचे निकषही बदलणे गरजेचे वाटू लागले आहे.
आपली पालकत्वाची व्याप्ती वाढवून पहिली तर संगोपन या शब्दाचा नव्याने अर्थ सापडेल एवढं नक्कीच. अनाथ, निराधार मुलांचे संगोपन कसे होते? त्यांसाठी झटणाऱ्या संस्था, शासनाकडून मिळणारे लाभ, बालकांचे हक्क यावर प्रकाशझोत टाकणारे प्रा. श्री. अतुल देसाई यांच्या आभास फाउंडेशन ने 'संगोपन ' हे मासिक आपल्याला पालकत्वाची व्याख्या नव्याने सापडायला मदत करते असे मला वाटते. संकुचित विश्वातून बाहेर पडायला खुणावते. सुरक्षित जगातून बाहेर पडून जीवनातील वास्तव बघण्याची नवी दृष्टी देते .
बालगृहात लहानाचे मोठे झालेले व आज समाजात स्वावलंबनाने, सन्मानाने जीवन जगत आहेत, त्यांचे काहींचे स्वानुभव वाचण्याची संधी 'संगोपन ' मुळे मला मिळाली. बालगृहात येण्यापूर्वी त्यांची झालेली आबाळ, नातेवाईकांकडून झालेली हेळसांड, त्यातून झालेली परवड त्यांच्याच शब्दांतून वाचताना डोळ्यात पाणी आलं. हृदय गलबलून गेलं. लहान वयातच परिस्थितीने मोठ्या झालेल्या या मुलांचे हे अनुभव इतरांसाठी प्रेरणा देणारे ठरतील यात शंकाच नाही.
नातेवाईकांपेक्षा बालगृहे हीच त्यांना आपल्यात सामावून घेणारी जवळची वाटली. सुरुवातीला नाईलाजाने दाखल होणारी ही मुलं संस्थेशी, तेथील मुलांशी अल्पावधीत एकरूप होतात. इथे आल्यावर त्यांना कळते की बरोबरीची मुलं समदुःखी आहेत. किंबहुना आपल्यापेक्षा वाईट स्थितीतून आली आहेत ही होणारी जाणीव स्वतःच्या दुःखाची धार बोथट करणारी वाटे. किती वास्तव व बोलके अनुभव आहेत!
एकमेकांना सांभाळत, सहकार्य करत ती जीवनातील धडे इथे गिरवत मोठी होतात. माणसाशी माणसासारखे वागावे हे संस्कार आपोपाप रुजतात. माणुसकीचं नातं जपायला, न मिळालेल्या नात्यांचं मोल जाणायला इथं ती शिकतात. निराधार मुलांना आधार देण्याचं, त्यांचं जीवन सावरण्याचं फार मोठं ईश्वरकार्य या संस्था करतात असे मला वाटते.
वृद्धांचे संगोपन हा विषयही मुलं असणाऱ्यांसाठी व नसणाऱ्यांसाठीही तितकाच संवेदनशील बनू पहात आहे.लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला बाळ जेव्हा म्हातारपणी जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडतो तेव्हा हेच का ते संगोपन जे सोयीनुसार बदलते असा विचार करायला लावते.
आज सेवाभावी संस्थांमुळेच संगोपन सुसह्य झाले आहे. संगोपन या शब्दाचा अर्थ नव्याने मला समजायला मदत झाली. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम.
मुग्धा कुळये
रत्नागिरी.