Thursday, October 18, 2018

जडणघडण मुलांची

           मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, बिघडलीयत, हाताबाहेर गेली आहेत......... अशी अनेक वक्त्तव्य आपणास आजूबाजूला ऐकायला मिळतात. घरात, शाळेत, समाजात सर्वत्र अशा सुरांची री ओढणारे अनेकजण भेटतात. पालक तर आपल्या मुलांपुढे हतबलच झालेले आहेत. लाडात वाढवलेलं मूल आता आपलं ऐकत नाही, दुरुत्तरे करतो हे उघडपणे सांगायलाही लाज वाटते. कारण कालपर्यंत ज्या मुलाचे अवाजवी कौतुक सांगत फिरणारे आता कोणत्या तोंडाने दुर्गुण सांगणार?
                     आज घराघरातून हे चित्र
दिसू लागलंय. तेव्हा पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. समुपदेशन मुलांचे नव्हे तर पालकांचे होणे गरजेचे वाटू लागलेय. मुलांचं चुकतंय म्हणण्यापूर्वी आपलं काही चुकतंय का हेही पाहायला हवं. एकुलतं एक म्हणून मूल मागेल ते आपण कौतुकाने देतो. एकही इच्छा अपुरी राहणार नाही याची काळजी घेतो. अगदी मोठा होईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरून आर्जव करून जेवण भरवतो, त्याला हवे ते तत्परतेने देतो. मुलाला मात्र आपल्या मनासारखं होईपर्यंत वाटेल तसं वागण्याची सवय लागते. पण ही सवय आपणच लावतो ना? लाड जरूर करावेत, पण जिथे शिस्त हवी तिथे हवीच.
                            कलागुण, कौशल्ये, ज्ञानलालसा यातील हट्ट जरूर प्रत्येक पालकांने जाणीवपूर्वक पुरवावेत. पण अवाजवी, चुकीच्या मागण्या मात्र समजावून नाकाराव्यात. सुरुवातीला मूल ऐकणार नाहीच. अशावेळी चांगल्या -वाईटाची समज आपण दिली तर हळूहळू मुलालाही कळते की कोणते हट्ट केले की आईबाबा आपलं ऐकतात. मग चांगल्या गोष्टींसाठीच हेका धरण्याची सवय अंगवळणी पडते.
                         मुलाला चांगल्या -वाईटाचे समजावत असताना आपल्याही आचरणातून चांगल्या गोष्टींचे प्रतिबिंब उमटायला हवे. अनुकरणप्रिय असणारे मूल आपल्या आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःहून समंजसपणे शहाण्यासारखं वागू लागेल एवढं मात्र नक्की.
                             मुग्धा कुळये
                             रत्नागिरी.

1 comment: