Thursday, December 6, 2018

हवी एक प्रेरणा

               'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 'असे धीराचे शब्द आपणांस एक जिद्द प्रेरणा देऊन जातात. आपल्या सोबत कोणीतरी आहे ही जाणीव अनेक संकटांवर मात करण्याचे बळ देते.
               'तू हे करू शकशील,करू शकतोस, तू करशीलच...... अशा खात्रीदायी शब्दांनी एक अनामिक इच्छाशक्ती आपल्याकडून एखादे अवघड कामही उत्तमरित्या करून घेते. फक्त गरज आहे एका सकारात्मक प्रोत्साहनाची. मनाचा मोठेपणा असणारे येता -जाता सहज प्रेरणा देतात . इतरांना मोठे करताना स्वतःही नकळत मोठे होऊन जातात.  
                याउलट जिद्दीने पुढे जाणाऱ्याला एखाद्या क्षणी नाउमेद केले तर तो घेऊ पाहात असलेली भरारी निष्प्रभ ठरते. त्याच्या पंखातील बळ एकाएकी नाहीसे होते.  तो कोसळतो मनाने व तनानेही. किती ताकद असते ना 'प्रोत्साहन'या शब्दांमध्ये?
                   माणसाची संकुचित वृत्ती असली की तो इतरांसाठी प्रेरणा देण्यापेक्षा अडचणींचा डोंगर ठरतो. अर्थात ज्याची इच्छशक्ती प्रबळ व चिवट असते, तो असा अडचणींचा डोंगर पार करून जातोच. थोडा जास्त वेळ व श्रम लागतात इतकेच. परंतु अडचणी आल्याशिवाय यशाचे मोल ठरत नाही. त्यामुळे अडचणी ह्या हव्यातच.
                  येणारे प्रत्येक संकट खूप काही शिकवून जाते. माणसे ओळखायला शिकवतो. संयम शिकवतो. नव्याने लढण्याची उर्मी देतो तसेच पुढे जाण्याची प्रेरणाही देतो.
                  हीहि वेळ निघून जाईल. जरा धीर धर. काळासारखा गुरू नाही. गरज नाही कुणा व्यक्तीच्या प्रेरणेची वा प्रोत्साहनाची. येणारी वेळच धैर्याने सामोरे जाण्याची जिद्द देणार आहे. मी लढेन, मी जिंकेन असा  स्वतःच, स्वतःला दिलेला आशावाद मला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे. माझीच मला दिलेली प्रेरणा माझ्या पंखात बळ देईल नव्याने उभारी व भरारी  घेण्याची.
        'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार '

Thursday, October 18, 2018

जडणघडण मुलांची

           मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, बिघडलीयत, हाताबाहेर गेली आहेत......... अशी अनेक वक्त्तव्य आपणास आजूबाजूला ऐकायला मिळतात. घरात, शाळेत, समाजात सर्वत्र अशा सुरांची री ओढणारे अनेकजण भेटतात. पालक तर आपल्या मुलांपुढे हतबलच झालेले आहेत. लाडात वाढवलेलं मूल आता आपलं ऐकत नाही, दुरुत्तरे करतो हे उघडपणे सांगायलाही लाज वाटते. कारण कालपर्यंत ज्या मुलाचे अवाजवी कौतुक सांगत फिरणारे आता कोणत्या तोंडाने दुर्गुण सांगणार?
                     आज घराघरातून हे चित्र
दिसू लागलंय. तेव्हा पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. समुपदेशन मुलांचे नव्हे तर पालकांचे होणे गरजेचे वाटू लागलेय. मुलांचं चुकतंय म्हणण्यापूर्वी आपलं काही चुकतंय का हेही पाहायला हवं. एकुलतं एक म्हणून मूल मागेल ते आपण कौतुकाने देतो. एकही इच्छा अपुरी राहणार नाही याची काळजी घेतो. अगदी मोठा होईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरून आर्जव करून जेवण भरवतो, त्याला हवे ते तत्परतेने देतो. मुलाला मात्र आपल्या मनासारखं होईपर्यंत वाटेल तसं वागण्याची सवय लागते. पण ही सवय आपणच लावतो ना? लाड जरूर करावेत, पण जिथे शिस्त हवी तिथे हवीच.
                            कलागुण, कौशल्ये, ज्ञानलालसा यातील हट्ट जरूर प्रत्येक पालकांने जाणीवपूर्वक पुरवावेत. पण अवाजवी, चुकीच्या मागण्या मात्र समजावून नाकाराव्यात. सुरुवातीला मूल ऐकणार नाहीच. अशावेळी चांगल्या -वाईटाची समज आपण दिली तर हळूहळू मुलालाही कळते की कोणते हट्ट केले की आईबाबा आपलं ऐकतात. मग चांगल्या गोष्टींसाठीच हेका धरण्याची सवय अंगवळणी पडते.
                         मुलाला चांगल्या -वाईटाचे समजावत असताना आपल्याही आचरणातून चांगल्या गोष्टींचे प्रतिबिंब उमटायला हवे. अनुकरणप्रिय असणारे मूल आपल्या आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःहून समंजसपणे शहाण्यासारखं वागू लागेल एवढं मात्र नक्की.
                             मुग्धा कुळये
                             रत्नागिरी.

Wednesday, October 10, 2018

अशी वाढवूया शैक्षणिक गुणवत्ता

            समाजात वावरताना बुजुर्ग व्यक्तींच्या तोंडी हमखास ऐकायला मिळते की, आजचे शिक्षण कुचकामी  व  बेगडी आहे. गुणांचा बुडबुडा फुटला की हाती काहीच नाही अशी स्थिती हल्लीच्या शिक्षणाची झाली आहे. असे उद्गार कानावर आले की, मन कुठेतरी आत्मचिंतन करू लागते. नकळत पूर्वीच्या व आताच्या शिक्षणाची मनोमन तुलना सुरू होते. स्पर्धेच्या युगात टिकण्याचा विचार केला तर आताचे शिक्षण पूर्णतः कुचकामी, भरकटलेले आहे असे ठरवणे योग्य होणार नाही. पण मग चुकतंय कुठे? काय निसटतंय? काळाबरोबर धावताना का अशी दमछाक होतेय? मुलांची व पर्यायानं पालकांचीही. फारच चिंतेची बाब आहे.
            मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या नावाखाली हे थोडं, ते थोडं हळूहळू सर्वच करण्याच्या अट्टाहासापायी एक नाही धड व भा राभर चिंद्या अशीच स्थिती निर्माण होऊ पाहतेय.  बालकाचा सर्वांगीण विकास हा गुणवत्तापूर्ण व्हायला हवा याकडे लक्ष दिले पाहिजे. गुणवत्ता महत्वाची, मग ती शिक्षणातली असो की, एखाद्या क्रियाकौशल्यातील असो.गुणवत्तेने ओतप्रोत भरलेले  शिक्षणच मुलाला उज्वल भविष्यकडे घेऊन जाणार आहे. शिक्षण घेताना मुलासोबत शिक्षक काय किंवा पालक काय हे फक्त आवश्यकता व गरज भासल्यास त्याला मदत करणार आहेत. स्वावलंबन व स्वयंप्रेरणेने शिक्षण मुलाला घेऊ द्यायचे आहे. का? कसे? कुठे? केव्हा? यांसारखे प्रश्न मुलाला पडायला हवेत व त्यांची उत्तरेही त्यानेच आपणहून शोधली, तरच त्याला शिकण्यातले स्वावलंबन येणार आहे. 
                      शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. व्यक्तिमत्व मुलाचे फुलवायचे आहे. मूल उत्स्फूर्त, सहज शिकेल यासाठी विविध अध्ययन अनुभव शिक्षकाने त्याच्या अवतीभवती तयार करायचे आहेत.मुलांच्या गरजांना प्राधान्यक्रम असला पाहिजे. प्रत्येक मुलाचा चेहरा, मन शिक्षकाला वाचता यायला हवे. यासाठी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ शिक्षकाने द्यायला हवा. विविध प्रश्न, प्रसंग यांच्या माध्यमातून मुलांच्या मनाचा ठाव घेणारा शिक्षकच त्या मुलामध्ये लपलेली सुप्त गुणवत्ता कल्पकतेने शोधून काढण्यात यशस्वी होतो .देखणेपणा वातावरण निर्मितीसाठी पोषक असला तरी गुणवत्तेसाठी दिखाव्याची काहीच गरज नसते.अत्यंत साध्या, सोप्या, सहज कृतीतून ढीगभर अध्ययन अनुभव देऊन उत्तम ते बाहेर काढायला पुरेसे ठरते. 
                        विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसन हे शिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट असले तरी शिकण्यासाठी वर्गात अनुकूल वातावरण निर्माण करणे हे शिक्षकाचे कौशल्य आहे. मूल निर्भयतेने शिकावे इतके मोकळे वातावरण शाळेत मुलांमध्ये व शिक्षकामध्ये असेल तर तिथे गुणवत्ता जोपासायला मदत मिळते. मुलाला नेमके काय हवे हे त्याने स्वतःहून हक्काने मागावं इतके हे गुरूशिष्याचे नाते जिव्हाळयाचे असायला हवे. गप्प बैस, चूप रहा, डोके खाऊ नकोस यांसारख्या दटावणीच्या सुराने मूल दुर्मुखते. बोलेनासे होते. नवीन विचार करण्याची उमेद संपते. मनातल्या मनात कुढत राहण्याची सवय लागते. शिक्षक हा हुकूमशाहा न वाटता तो मुलांच्या मनात प्रेमाची, वात्सल्याची ज्योत लावायला यशस्वी झाला तर तिथे गुणवत्ता विकसित होते,फुलते व प्रकाशमानही होते. 
                      विध्यार्थ्यांच्या अध्ययनातील कच्चे दुवे शोधत असताना एखादा घटक शिकवूनही मुलाला समजत नसेल तर दोष त्या मुलाचा कमी व शिकवण्याच्या पद्धतीतला जास्त असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आत्मपरीक्षणां ने याचा शोध शिक्षकाने घेतल्यास उपाय करणे सोपे होते. विदया र्थ्यांना सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकडे नेताना या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे ठरते. 
                           मुलांमध्ये दर्जेदार गुणवत्ता रुजवण्यास, एखादा शिक्षक नाविन्यपूर्ण अध्ययन अनुभव योजत असेल तर वरिष्ठांकडूनही प्रोत्साहन  व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. आपण सांगू, म्हणू त्याप्रमाणेच व्हायला हवं या अट्टाहासामुळं शिक्षकाच्या क्रियाशीलतेला मर्यादा पडतात. तो नाउमेद होतो. उत्तमाची अपेक्षा असेल तर त्याला स्वायत्ततेने काम करू दिल्यास नक्कीच गुणवत्ता मिळेल. मात्र हा विश्वास शिक्षकाने निर्माण करायला हवा व वरिष्ठानी तो दाखवायला हवा. 
                            शिक्षकांना पालकांची सक्रिय साथ मिळाल्यास दर्जेदार शिक्षणाच्या दिशेने मुलांचा प्रवास सुरू व्हायला मदत मिळते. मुलांना येणाऱ्या अडचणी पालकांनी नियमित शिक्षकांच्या संपर्कात राहून जाणून घेतल्यास तेही अधिक दक्ष राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहतील. नक्कीच मग कोणताही डामडौल न करता दिंडोरा न पिटता अगदी खेडोपाडयातही, वाडीवस्तीत दर्जेदार शिक्षणाचे रोप फुलवता येते हे सिद्ध होईल. 
        मात्र यासाठी, 
                     उत्तम ते पेरू या, रुजवू या, फुलवू या l
                      हा वसा प्रत्येक शिक्षकाने घेऊ या ll
                           
                                             मुग्धा कुळये 
                                               रत्नागिरी.