Mugdha Kulaye
Sunday, April 26, 2020
सृष्टी लॉकडाऊनमधली
Sunday, August 11, 2019
*सण व उत्सव आणि त्यांचे बदलणारे स्वरूप* मनाला उल्हासित व ताजेतवाने करणाऱ्या सण व उत्सवांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. सतत काबाडकष्ट करणाऱ्या शरीराला व मनालाही विरंगुळा देण्याचं काम या सण,समारंभ व उत्सवांनी अनादिकालापासून केले आहे. फार पूर्वीपासूनच आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व दूरदर्शीपणे सण, समारंभ, उत्सव यांची काळ, वेळ, ऋतू, आरोग्य यांचा विचार करून त्याप्रमाणे साजरे करण्याची प्रथा सुरू केली आहे. श्रावण महिन्यात शेतीची बरीचशी कामे झालेली असतात. माणसे रिकामी असतात. शिणलेला जीव मग तो प्राण्यांचा असो की माणसांचा, त्याला उत्साहित हे सण करत असतात. या दिवसात कार्यशक्ती कमी वापरल्याने पचनशक्ती ही मंदावलेली असते. म्हणून श्रावणात व्रत -वैकल्ये जास्त असतात. आहारही हलका असावा असा आग्रह धरला जातो. ऋतूनुसार येणाऱ्या सणांचे पदार्थही आपल्या आरोग्याचा विचार करूनच केले जातात. जसे शरीराचे तसेच मनाचे आरोग्य या सण समारंभातून, उत्सवातून जपले जाते. त्यानिमित्ताने चार माणसे एकत्र येतात. हलक्याफुलक्या गप्पा होतात, खुशाली घेतली जाते. भजन, कीर्तन यातून मंगलमय वातावरण तयार होतेच शिवाय अनेक सार्वजनिक मंडळांच्या इथे मुलांसाठी, महिलांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जणू एक व्यासपीठ मिळते. अशा लहान-मोठ्या मंडळातूनच अनेक कलाकार उदयास आले आहेत. खूप सकारात्मक ऊर्जा तनमनाला मिळते. नवचैतन्य आणणाऱ्या या सण उत्सवांचे स्वरूप मात्र आता दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. महात्मा फुले, टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवांचा मूळ हेतू बाजूला पडून आधुनिकतेच्या नावाखाली हीन दर्जाचे संगीत, अश्लील गाणी व कर्णबधिर करणारे डीजे कार्यक्रमाचा बेरंग करतातच शिवाय ध्वनि प्रदूषण वाढवण्याचं काम करतात . श्रद्धा, भक्तीभाव यापेक्षा व्यवहार जास्त आला आहे. पैसे कमावणे, मौजमजा करणं, कामधंदा सोडून उत्सवाच्या डामडौलासाठी दिवस वाया घालवताना आजची तरुणाई दिसते. घराघरातून आजही कर्ज काढून सण साजरे करून खोटी प्रतिष्ठा दाखवली जाते. महागाई वाढली आहे. जीवनावश्यक गरजा भागवणं कठीण झाले असताना या नको त्या मोठेपणासाठी लोक आयुष्य पणाला लावतात. तेव्हा मात्र खरंच सण साजरे करणं गरजेचेच आहे का? असा प्रश्न पडतो. आपले मनोधैर्य व मनोबल वाढवण्यासाठी हे सण व उत्सव सर्वांनीच सकारात्मक पद्धतीने साजरे केले तर अशा कार्यक्रमातून नवीन एकसंघ पिढी घडायला, वाढायला मदतच होईल. पुढील पिढीला वेळीच समाजभान देता येईल. पर्यावरण पूरक, सामाजिक, नैतिक मूल्य जपणारे सण व उत्सव साजरे करूया व हा सांस्कृतिक वारसा समृद्धपणे नवीन पिढीकडे सोपवू या. नवचैतन्य घेऊन येती सण, उत्सव हे घराघरातुनी l दुजाभाव विसरून सारी स्नेह जपती मनामनांतुनी ll म्हणून सण, उत्सव हवेतच. सणांचा हा वाडवडिलांचा वारसा खूप चांगल्या पद्धतीने साजरा आपण करू या व इतरांसही सांगू या. मुग्धा कुळये रत्नागिरी.
Tuesday, February 26, 2019
राजभाषा मराठी
मराठी असे अमुची राजभाषा
उजळीतसे ती सारी दशदिशा ll
तिची थोरवी ती काय वर्णावी
नटली सजली साहित्य तऱ्हांनी ll
साहित्य नगरी तिचा आज उदो उदो
असाच सन्मान नित्य तिला लाभो ll
झेंडा मायमराठीचा दिगंतात जावो
सदा सहवासाचा वरदहस्त राहो ll
मायबोली मराठी करू तिचा सन्मान
मराठी भाषिक आम्हा तिचा अभिमान ll
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Saturday, February 16, 2019
'शिक्षण म्हणजे......'
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. जन्मापासून अंतापर्यंत शिकण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. या प्रवासात अनेक गुरू लाभतात. चांगल्या वाईटाचा नकळत आपल्यावर प्रभाव पडतो व त्यातून आपले आचरण घडते. जिज्ञासेपोटी आपण काहीतरी नवीन आत्मसात करतो. सारासार विचार करण्याची क्षमता निसर्ग, व्यक्ती, चांगली पुस्तके यांच्याकडून घेतलेल्या अनुभूतीतून मिळते. तसेच अनुभूतीतून मिळणारी अनुभूती हीसुद्धा खूप काही शिकवून जाते.
'शिक्षण म्हणजे.... ' हे श्री. अमर घाटगे, केंद्रप्रमुख, शिरगाव, रत्नागिरी यांचं पुस्तक वाचलं.श्री. घाटगे सर म्हणजे आपल्या वाणीने व लेखणीने प्रभावित करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असे सर्वपरिचित. त्यांची नेटकी भाषाशैली वाचकांना प्रेरणा देणारी ठरेल हे नक्की. आटोपशीर सहज हाताळण्याजोगं तसेच मुखपृष्ठावरील बालचमूंच्या रंगीत शृंखलेने सजलेलं हया पुस्तकाने लक्ष वेधून घेतलं. मान्यवरांच्या प्रस्तावनेवरून खूप छान विचार वाचायला मिळणार याची जणू खात्री झाली. १२९ पर्णात सामावलेल्या या पुस्तकात ५८ भागात शिक्षणविषयक विचारांना स्वानुभवाची सांगड घालत छान शब्दबद्ध केले आहे. छोट्या -छोट्या घटकांतून मार्मिक चिंतनशील विचार दिले आहेत.
पिता व मुलीचं हळवं नातं जणू आपल्यासमोर उलगडलं आहे. मुलीचे प्रश्न, तिची जिज्ञासा त्यातून त्यांचं पिता म्हणून घडत जाणे हे फार संवेदनशीलपणे मांडलं आहे. मुलांचं निरागस बाल्य जपण्यासाठी पालकांनी व्यस्ततेतूनही वेळ देणं, जागरूकपणे त्यांना समजून घेणं, त्यांचे भावविश्व जपणं ही मुलांची गरज तर आहेच शिवाय हक्कही आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित व्हायला मदत होते.
जिल्हा परिषद शाळेतून व मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण मुलं किती सहजतेने आत्मसात करतात हे स्वानुभवातून सांगितले आहे.घेतलेल्या ज्ञानाचं व्यवहारात उपयोजन करता येणं म्हणजे शिक्षण. प्रेम वाटायला, मदत करायला, जातधर्म विसरायला, आदर करायला, आनंदाने जगायला शिकवतं ते शिक्षण असा फार सुंदर व व्यापक विचार आपणांस चिंतन करायला लावणारा आहे.
एक शिक्षक म्हणून व एक अधिकारी म्हणून स्वतःच्या कारकिर्दीचा परामर्श घेताना आपण अधिकाऱ्यांचे शिक्षकांशी, मुलांशी नातं हुकूमशहा असं न राहता मैत्रीचं व मनमोकळं असल्यास शिक्षण प्रक्रिया आनंददायी होईल हा स्तुत्य संदेशही देऊन जाता. निर्भय वातावरणात खऱ्या अर्थाने शिक्षण रुजेल, उमलेल व फुलेलही हा विचार मिळाला.
घेतलेल्या अनुभवांना विचारांची सांगड घातली तर चांगली मूल्ये रुजवायला मदत होते. अशा चांगल्या विचारांची पेरणी करणारे आपल्यासारखे शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ आज समाजात आहेत म्हणूनच शिक्षण समाजपरिवर्तनाचे माध्यम आहे याची साक्ष पटते.
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Friday, February 15, 2019
'संगोपन'
'संगोपन ' हा विषय पालक व एक शिक्षक म्हणून पण माझा जिव्हाळ्याचा आहे. संगोपन म्हटलं की फक्त बाळाला वाढवणं, त्याला खाऊ -पिऊ घालणं, त्याला सांभाळणं एवढंच असा समज आहे. पालक म्हणून मूल वाढवताना हे आपलं कर्तव्य खूप प्रेमाने करत असतो. तरीही खऱ्या अर्थाने होते का संगोपन? हा चिंतनाचा विषय आहे. खरं तर खूप व्यापक असा हा विषय आहे. प्रसंगानुरूप, परिस्थितीनुरुप बदलणारा आहे. इथे कालचे अनुभव आज उपयोगाचे असतीलच असे नाही. काळ बदलला, पालक बदलले, मुलं बदलली तसे संगोपनाचे निकषही बदलणे गरजेचे वाटू लागले आहे.
आपली पालकत्वाची व्याप्ती वाढवून पहिली तर संगोपन या शब्दाचा नव्याने अर्थ सापडेल एवढं नक्कीच. अनाथ, निराधार मुलांचे संगोपन कसे होते? त्यांसाठी झटणाऱ्या संस्था, शासनाकडून मिळणारे लाभ, बालकांचे हक्क यावर प्रकाशझोत टाकणारे प्रा. श्री. अतुल देसाई यांच्या आभास फाउंडेशन ने 'संगोपन ' हे मासिक आपल्याला पालकत्वाची व्याख्या नव्याने सापडायला मदत करते असे मला वाटते. संकुचित विश्वातून बाहेर पडायला खुणावते. सुरक्षित जगातून बाहेर पडून जीवनातील वास्तव बघण्याची नवी दृष्टी देते .
बालगृहात लहानाचे मोठे झालेले व आज समाजात स्वावलंबनाने, सन्मानाने जीवन जगत आहेत, त्यांचे काहींचे स्वानुभव वाचण्याची संधी 'संगोपन ' मुळे मला मिळाली. बालगृहात येण्यापूर्वी त्यांची झालेली आबाळ, नातेवाईकांकडून झालेली हेळसांड, त्यातून झालेली परवड त्यांच्याच शब्दांतून वाचताना डोळ्यात पाणी आलं. हृदय गलबलून गेलं. लहान वयातच परिस्थितीने मोठ्या झालेल्या या मुलांचे हे अनुभव इतरांसाठी प्रेरणा देणारे ठरतील यात शंकाच नाही.
नातेवाईकांपेक्षा बालगृहे हीच त्यांना आपल्यात सामावून घेणारी जवळची वाटली. सुरुवातीला नाईलाजाने दाखल होणारी ही मुलं संस्थेशी, तेथील मुलांशी अल्पावधीत एकरूप होतात. इथे आल्यावर त्यांना कळते की बरोबरीची मुलं समदुःखी आहेत. किंबहुना आपल्यापेक्षा वाईट स्थितीतून आली आहेत ही होणारी जाणीव स्वतःच्या दुःखाची धार बोथट करणारी वाटे. किती वास्तव व बोलके अनुभव आहेत!
एकमेकांना सांभाळत, सहकार्य करत ती जीवनातील धडे इथे गिरवत मोठी होतात. माणसाशी माणसासारखे वागावे हे संस्कार आपोपाप रुजतात. माणुसकीचं नातं जपायला, न मिळालेल्या नात्यांचं मोल जाणायला इथं ती शिकतात. निराधार मुलांना आधार देण्याचं, त्यांचं जीवन सावरण्याचं फार मोठं ईश्वरकार्य या संस्था करतात असे मला वाटते.
वृद्धांचे संगोपन हा विषयही मुलं असणाऱ्यांसाठी व नसणाऱ्यांसाठीही तितकाच संवेदनशील बनू पहात आहे.लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला बाळ जेव्हा म्हातारपणी जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडतो तेव्हा हेच का ते संगोपन जे सोयीनुसार बदलते असा विचार करायला लावते.
आज सेवाभावी संस्थांमुळेच संगोपन सुसह्य झाले आहे. संगोपन या शब्दाचा अर्थ नव्याने मला समजायला मदत झाली. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम.
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Wednesday, February 13, 2019
'मदत करणारे हात '
' भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', असे धीराचे नुसते शब्द जरी कानावर पडले तरी संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. धीराच्या आश्वासक शब्दांमध्ये मोठ्यातलं मोठं संकटही झेलायचं सामर्थ्य असते. संकटात माणूस एकाकीपणाच्या भावनेनं खचतो, आत्मबल गमावतो, नैराश्य येतं. अशावेळी मदतीचा एक हात, 'बुडत्याला काडीचा आधार 'या म्हणीला सार्थ ठरवत सावरण्याचे काम करतो.
संवेदनशीलतेने आपण इतरांच्या दुःखाशी, अडचणींशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा काहीतरी करायला हवं या जाणिवेची मनाच्या गाभाऱ्यात एक इवलीशी ज्योत प्रज्वलित होते. पेटलेला दीप अखंड तेवत राहण्यासाठी ज्योतीने ज्योती लावायला हव्यात नाही का? असाच एक दीप 'हेलपिंग हॅन्ड्स ग्रुप ऑफ रत्नागिरी 'प्रज्वलित झाला आहे.खात्री आहे पुढे जाऊन हा छोटासा दीप इतरांसाठी दीपस्तंभ ठरेल.
अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिकणारी मुले इतर नामांकित शाळांच्या तुलनेत फारशी कुठे चमकत नाहीत असा माझा व्होरा होता. परंतु संख्यात्मक गुणवत्तेपेक्षा संस्कारक्षम गुणात्मक गुणवत्ता येथील माजी विद्यार्थ्यांनी जी दाखवली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. 22 ते 23 वर्षे वयोगटातील ही मुले, इतरांसाठी काहीतरी करावं या जाणिवेनं स्वतः सेटल नसतानाही एवढ्या लहान वयात एका छान विचाराने एकत्र येतात. या ग्रुपमध्ये आमच्या शेजारची एक मुलगी आहे.तिने तिच्या या ग्रुपबद्दल मला सांगितले. मला ऐकून चांगलं वाटलं. तू ही जॉईन होशील का? असे तिने मला विचारताच या ग्रुपमधील इतर कोणी ओळखीचे नसतानाही केवळ दुसऱ्यांसाठी फुटू पाहणारे हे कोंब, यांना छान धुमारे फुटावेत, त्याचा पुढे जाऊन मोठा वृक्ष व्हावा, तसेच हे रोप मोठे होण्यास आपलाही हातभार लागावा या हेतूने मी त्यांना लगेच जॉईन झाले. आणि आज त्यांचं हे रुजणं कौतुकाने पहातेय.
स्वतः शिकत, कामासाठी धडपड करत असताना प्रत्येकाने महिन्यातून किमान 100/रुपये फंड जमा करावा ही माफक अपेक्षा. एकमेकांवरील विश्वासाने पैसे एकत्र करून गेल्या काही महिन्यात छोटे छोटे 3ते 4 कार्यक्रम करून जिथे मदत केली तेथील गरज विचारात घेऊन ग्रुपच्या क्षमतेनुसार छोटेखानी मदतही केली. अशावेळी ज्यांना शक्य होईल ते येऊन तो कार्यक्रम छान निभावून नेतात. या मुलांचं कौतुक अशासाठी की ज्या वयात तरुणाई मौजमजेत जगत असताना ही मुलं मात्र आपल्या संघर्षमय जीवनात गरजूना मदतीचा हात देऊ पाहताहेत.
क्षमता असणारे हातही सहसा कुणासाठी पुढे सरसावत नाहीत. इतरांसाठी काहीतरी करावं ही इच्छाच नसते. किंबहुना मी, माझं यापलिकडे पाहण्याची गरज वाटत नाही. देवधर्मासाठी शे -पाचशे रुपये सहज देतात. हेतू हाच की तेवढंच पुण्य मिळेल. इथेही देण्यामागे छुपा स्वार्थच दडलेला असतो. मूर्तीतल्या देवाला गरज नसतानाही अलंकारांनी सजवलं जातं. परंतु दारात आलेल्या गरजूला हाडतूड केलं जातं.
माणूस कोणत्याही जातीधर्माचा असो त्याचा धर्म एकच मानवता धर्म असायला हवा. माणसा-माणसाचं फक्त आणि फक्त माणुसकीचं नातं असायला हवे. जुनी पिढी अज्ञानामुळं असेल वा कर्मठपणामुळे असेल अनिष्ट रूढी परंपराना गोंजारत राहिली. परंतु हे चित्र बदलण्याचे सामर्थ्य केवळ आताच्या सुशिक्षित तरुण पिढीमध्ये आहे नव्हे असायलाच हवं. समविचारांनी एकत्र येऊन समाजात काही चांगलं योगदान देऊ पाहतील तेव्हाच थोड्याफार प्रमाणात मना-मनातील अंतर मिटवण्यास पूरक स्थिती निर्माण होईल. एकजुटीसाठी वेगळ्या जाणीव जागृतीची गरज मग उरणार नाही.
धन्य ते पालक व धन्य ती शाळा ज्यांनी हेलपिंग हॅन्ड्सच्या रूपात समाज उभारणीसाठी सुजाण नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक जबाबदार पिढी समाजाला दिली. चला तर मग......
ज्योतीने ज्योती उजळवू या
हाताला हात देऊ या ll
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Tuesday, February 12, 2019
'जग हे सुंदर आहे '
माणूस म्हणून जन्माला आल्यावर समूहात जगणं ही त्याची गरज असते. समाजाने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत जगणं त्याला बंधनकारक असते. ते सर्वांच्याच हिताचं असतं. पण कधीतरी समाजविरोधी स्थिती उद्भवली तरी त्या व्यक्तीला स्वतः साठी ठोस असं काहीच ठरवता येत नाही, की निर्णय घेता येत. सतत इतरांना काय वाटेल या भीतीच्या छायेत त्याच्या आतल्या 'स्व'ला तो नकळत मिटवत जातो. तर एखादा या प्रवाहाविरोधात जाण्याचं धाडस करतो व त्याला सापडतो स्वतःच्या आत विखुरलेला 'स्व'.त्याला तो एकत्रित करतो व नव्या उमेदीने भरारी घेतो.
' ब्र 'हे लेखिका कविता महाजन यांचं आदिवासींच्या सामाजिक जीवनावर, आजूबाजूच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारं पुस्तक वाचनात आलं. अंतर्मनाला भिडणारं असं हे लेखन मला नकळत त्या दुनियेत घेऊन गेलं. तिथे मला प्रफुल्ला भेटली. प्रफुल्ला ही सर्वसाधारण गृहिणीचं प्रतिनिधीत्व करणारी सामान्य स्त्री ते सेवाभावी वृत्तीने कार्य करणारी एक खंबीर स्त्री. हा तिचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. तिच्यातील होत गेलेले बदल थक्क करणारे आहेत. परिस्थितीला धैर्याने सामोरं जाऊ पाहणाऱ्या अनेकजणींसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की.
प्रफुल्ला एक घटस्फोटित स्त्री. जिला नवऱ्याने व स्वतःच्या मुलानेही नाकारले. पोटगीवर जगणारी, परिस्थितीसमोर हताश झालेली अगतिक स्त्री. तिच्या जीवन जगण्यास काही अर्थ नाही अशी निर्माण झालेली स्थिती. का? कुणासाठी? कशासाठी जगतोय? या निरर्थक जगण्याला काय अर्थ आहे असं वाटत असतानाच 'प्रगत 'या सामाजिक संस्थेशी तिचा संपर्क येतो व तिला सापडतो जगण्याचा नवा अर्थ व दृष्टिकोन.
खरंतर काहीच पूर्वानुभव नसताना चित्रकला विषयाची पदवीधर प्रफुल्ला सामाजिक संस्थेत वेळ सत्कारणी लावावा, तेवढंच गुंतून राहिलो तर एकाकीपणाची धार बोथट होईल व स्वतःलाही अजमावता येईल या विचाराने ती हे काम हाती घेते महाराष्ट्रातील आदिवासी स्त्रियांचा राजकारणातील सहभाग, समाजकारण ते राजकारण प्रवास, यात महिला म्हणून येणाऱ्या अडचणी,समस्या, प्रत्यक्ष निवडून आल्यावर येणारे अनुभव याबाबतचा सर्वे करण्याचं काम ती सुरू करते. आदिवासी वस्ती असणाऱ्या गावात जाऊन तेथील निवडून आलेल्या स्त्रियांची भेट घेणं, त्यांच्याशी बोलून कामाचं स्वरूप जाणून घेण्याचं काम ती अत्यंत मनापासून, आवडीने प्रसंगी त्यांच्यातीलच एक होऊन करते. तिला भेटलेली अनेक माणसं जीवनाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी तिला देतात. शहरात राहिलेली एक नाजूक स्त्री खेडोपाडयात,डोंगरदऱ्यात, रानोमाळ, उन्हातान्हातून, काट्याकुटयांतून बरेच वेळा पायी प्रवास व त्यातून घडत गेलेली कणखर स्त्री माझ्यातल्या स्त्रीला भावते जवळची वाटते.
समाजात अशा किती प्रफुल्ला आहेत की ज्यांना अशी नवी उमेद देणारी वाट सापडली?असं एकाकी आयुष्य आलं की कोलमडून पडणाऱ्याच जास्त बघायला मिळतात. जणू जीवन जगण्यासाठी एकच निमित्त असतं. कोशातून बाहेर डोकावलं तर अनेक सन्मार्गाच्या वाटा खुणावतील. गरज आहे ती नव्याने जग समजून घेण्याची. जीवन सुंदर जगण्याचे अनेक पर्याय आहेत. या जगण्यात इतरांनाही सामावून घेतल्यास आपणासाठी सर्व नसून सर्वांसाठी आपण ही व्यापक दृष्टी मिळेल व सौंदर्याचा एक नवा मापदंड जग सुंदर असल्याची अनुभूती देईल. चला तर मग देऊ संदेश नवा 'जग हे सुंदर आहे, जग हे सुंदर आहे '.
सौ. मुग्धा कुळये
रत्नागिरी.