Sunday, August 11, 2019

*सण व उत्सव आणि त्यांचे बदलणारे स्वरूप* मनाला उल्हासित व ताजेतवाने करणाऱ्या सण व उत्सवांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. सतत काबाडकष्ट करणाऱ्या शरीराला व मनालाही विरंगुळा देण्याचं काम या सण,समारंभ व उत्सवांनी अनादिकालापासून केले आहे. फार पूर्वीपासूनच आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व दूरदर्शीपणे सण, समारंभ, उत्सव यांची काळ, वेळ, ऋतू, आरोग्य यांचा विचार करून त्याप्रमाणे साजरे करण्याची प्रथा सुरू केली आहे. श्रावण महिन्यात शेतीची बरीचशी कामे झालेली असतात. माणसे रिकामी असतात. शिणलेला जीव मग तो प्राण्यांचा असो की माणसांचा, त्याला उत्साहित हे सण करत असतात. या दिवसात कार्यशक्ती कमी वापरल्याने पचनशक्ती ही मंदावलेली असते. म्हणून श्रावणात व्रत -वैकल्ये जास्त असतात. आहारही हलका असावा असा आग्रह धरला जातो. ऋतूनुसार येणाऱ्या सणांचे पदार्थही आपल्या आरोग्याचा विचार करूनच केले जातात. जसे शरीराचे तसेच मनाचे आरोग्य या सण समारंभातून, उत्सवातून जपले जाते. त्यानिमित्ताने चार माणसे एकत्र येतात. हलक्याफुलक्या गप्पा होतात, खुशाली घेतली जाते. भजन, कीर्तन यातून मंगलमय वातावरण तयार होतेच शिवाय अनेक सार्वजनिक मंडळांच्या इथे मुलांसाठी, महिलांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जणू एक व्यासपीठ मिळते. अशा लहान-मोठ्या मंडळातूनच अनेक कलाकार उदयास आले आहेत. खूप सकारात्मक ऊर्जा तनमनाला मिळते. नवचैतन्य आणणाऱ्या या सण उत्सवांचे स्वरूप मात्र आता दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. महात्मा फुले, टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवांचा मूळ हेतू बाजूला पडून आधुनिकतेच्या नावाखाली हीन दर्जाचे संगीत, अश्लील गाणी व कर्णबधिर करणारे डीजे कार्यक्रमाचा बेरंग करतातच शिवाय ध्वनि प्रदूषण वाढवण्याचं काम करतात . श्रद्धा, भक्तीभाव यापेक्षा व्यवहार जास्त आला आहे. पैसे कमावणे, मौजमजा करणं, कामधंदा सोडून उत्सवाच्या डामडौलासाठी दिवस वाया घालवताना आजची तरुणाई दिसते. घराघरातून आजही कर्ज काढून सण साजरे करून खोटी प्रतिष्ठा दाखवली जाते. महागाई वाढली आहे. जीवनावश्यक गरजा भागवणं कठीण झाले असताना या नको त्या मोठेपणासाठी लोक आयुष्य पणाला लावतात. तेव्हा मात्र खरंच सण साजरे करणं गरजेचेच आहे का? असा प्रश्न पडतो. आपले मनोधैर्य व मनोबल वाढवण्यासाठी हे सण व उत्सव सर्वांनीच सकारात्मक पद्धतीने साजरे केले तर अशा कार्यक्रमातून नवीन एकसंघ पिढी घडायला, वाढायला मदतच होईल. पुढील पिढीला वेळीच समाजभान देता येईल. पर्यावरण पूरक, सामाजिक, नैतिक मूल्य जपणारे सण व उत्सव साजरे करूया व हा सांस्कृतिक वारसा समृद्धपणे नवीन पिढीकडे सोपवू या. नवचैतन्य घेऊन येती सण, उत्सव हे घराघरातुनी l दुजाभाव विसरून सारी स्नेह जपती मनामनांतुनी ll म्हणून सण, उत्सव हवेतच. सणांचा हा वाडवडिलांचा वारसा खूप चांगल्या पद्धतीने साजरा आपण करू या व इतरांसही सांगू या. मुग्धा कुळये रत्नागिरी.