प्राथमिक शिक्षिका म्हणून जवळ जवळ चोवीस वर्षांच्या या प्रवासात निरागस उमलत्या भावविश्वाशी माझे नाते जुळत गेले. शहरातल्या शाळांपासून ते अगदी दुर्गम खेड्यातल्या शाळांपर्यंत मी मुलांची अनेक रूपे पहिली. कधी मोठी म्हणून तर कधी त्यांच्याच वयाशी, भावनांशी एकरूप होऊन त्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एक समानानुभूती मिळत गेली.
मूल हे मूल असतं. ते कधी चुकीचं नसतं. त्याच्या ठिकाणी ते बरोबर असतं. पण आपण मात्र चौकटीत जगणारे लहान -सहान गोष्टींचा त्याला आनंद घेऊ न देता सतत सूचना देत राहतो. शिस्तीची अपेक्षा करत राहतो. कधीतरी अगदी मूल होऊन त्याच्या वयाचे होऊन बघा. त्यांचं उमलण समजून घेत त्याला समजून घेणं आपल्यासाठी एक आव्हानच असते. त्याच्यातीलच एक जेव्हा आपण होतो, तेव्हा कितीतरी सूक्ष्मातल्या सूक्ष्म बाबी आपल्या लक्षात येतात.
माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गात एक मुलगा यावर्षी दाखल झाला. अंगणवाडीत असताना तो इतर मुलांसारखा सर्वसामान्य वागत नसायचा. हाक मारली तरी ओ द्यायचा नाही. सांगितलेल्या सूचना ऐकायचा नाही. एकूणच त्याचं सगळं वागणंच त्रासदायक वाटायचं माझंही निरीक्षण होतं. तो असा विक्षिप्तपणे वागे की हा अपंगत्वाच्या कोणत्या तरी प्रकारात असणार असे वाटून जाई. पहिलीत आपल्यासमोर आव्हान आहे असेच वाटे(संकट नव्हे ).
मुलगा पहिलीत दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे त्याचं वागणं,बोलणं इतर मुलांसारखं नसे. तो नजरेला नजर देऊन बोलायचं टाळे. प्रश्न विचारला तर इतरत्र बघत उत्तरे देत असे. बोलायला बिचकत असे. तो असा वेंधळा, खुळा, डोक्याने कमी असाच घरच्यांपासून ते बाहेरच्यांपर्यंत सर्वांचं ठाम मत. सुरुवातीला मलाही तो गतिमंद आहे असेच वाटे. पेन्सिल नीट पकडता यायची नाही. दुरेघीत लिहिता येत नसे. पाटी असली तर पेन्सिल नाही, पुस्तक असले तर वही नाही. विचारलं तर आईने दिलं नाही असे प्रामाणिकपणे सांगायचा. त्याच्या उत्तरांवर राग जरी आला तरी त्याची केविलवाणी अवस्था पाहून दया यायची.
छोटी छोटी कामे करताना त्याचा खूप गोंधळ उडत असे. सहजपणे कामात ताळमेळ साधता येत नसे. घाबरून, गोंधळून तो आणखी चुका करायचा.
मग मी त्याचा हा उडणारा गोंधळ थांबविण्यास त्याची मदत करू लागले. पेन्सिल नसली तर देऊ लागले. ओळी मारून दे, तर कुठे दप्तर आवरायला मदत कर. अशा छोट्या कामात त्याला धीर देऊन ते कसं करावं हे समजावू लागले. मी कृतीतून दाखवत असताना सुरुवातीला त्याच्या फजितीवर हसणारे त्याचे वर्गमित्रही मग त्याला लहान सहान कामात मदत करू लागले. धीराच्या शब्दांमुळे व मदतीच्या हातांमुळे तो थोडा आश्वासक बनला.
हळूहळू हा मुलगा आम्हां सर्वांसोबत छान रूळू लागला,खुलू लागला. त्याला चांगले लिहिता येत नसे म्हणून मराठी विषयाचा अभ्यास करायला आवडत नाही. हे तो प्रांजळपणे सांगायचा व गणित, इंग्लिश फार आवडते हेही आवर्जून सांगायचा. वाचायला पण यायला हवे ना हे समजावून सांगितल्यावर तो अभ्यास मन लावून करू लागला. मग मीही त्याने फार सुंदर लिहावं हा अट्टाहास न धरता त्याला त्या विषयाची आधी गोडी वाटेल अशाच कृती करून घेतल्या. आता तो खूप आवडीने अभ्यास करू लागला आहे.
चित्र, प्रसंग यातील निरीक्षण फार चांगले करतो. स्वतःच्या कल्पनेने ते सांगण्याचा प्रयत्न करतो. चर्चेत सहभागी होतो. पटकन उत्तरे देतो. अंकज्ञान, स्पेलिंग पाठांतर, वाचन उत्तम करू लागला आहे. त्याच्यातील हा आश्चर्यकारक बदल अनुभवण्यासाठी मला एक शिक्षक म्हणून खूप संयमाने, प्रेमाने, मायेने त्याच्याशी वागणं दिशादर्शक ठरलं हे मात्र नक्की.
इतरांपेक्षा वेगळा हा राजहंस ओळखण्यात मी यशस्वी झाले याचे मला खूप समाधान वाटत आहे.
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Monday, January 7, 2019
तो एक राजहंस
Subscribe to:
Posts (Atom)